×
एकविरा फाउंडेशनच्या वतीने यशोधन जनसंपर्क कार्यालयात महिलांसाठी फायर अँड सेफ्टी प्रशिक्षण

 'फायर अँड सेफ्टी' – एक आवश्यक जीवनकौशल्य.... 


आजच्या धावपळीच्या युगात घरगुती तसेच व्यावसायिक पातळीवर अग्नी सुरक्षेचे महत्त्व अधिक वाढले आहे. आग लागल्यास होणारे आर्थिक नुकसान, जीवितहानी आणि मानसिक धक्का टाळण्यासाठी ‘फायर अँड सेफ्टी’ विषयावर प्रशिक्षण घेणे आवश्यक ठरते.घरगुती एल.पी.जी गॅसचा वापर करताना योग्य काळजी न घेतल्यास गंभीर अपघात होऊ शकतात.


गॅस गळती, चुकीची वायरिंग, किंवा निष्काळजीपणामुळे आग लागण्याच्या घटना घडतात. यासाठीच महिलांना व घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींना गॅसच्या सुरक्षित वापराबाबत जागरूक करणे आवश्यक आहे.फायर अँड सेफ्टी प्रशिक्षणात आग लागल्यास न घाबरता कशा पद्धतीने परिस्थिती  हाताळावी, फायर एक्स्टिंग्विशर कसा वापरावा, धूर आणि गरम हवेतून सुरक्षित रस्ता कसा शोधावा, अशा महत्वाच्या गोष्टी शिकविल्या जातात. यामुळे अपघात टाळता येतात आणि आपली, कुटुंबाची व शेजाऱ्यांचीही सुरक्षा करता येते.शेवटी, आग ही संकटाची सूचना असते, परंतु सतर्कता आणि योग्य प्रशिक्षण हे तिच्याशी सामना करण्याचे प्रभावी साधन ठरते.


फायर अँड सेफ्टी ही काळाची गरज आहे, जी प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे. याच पार्श्वभूमीवर एकविरा फाउंडेशन आयोजित यशोधन जनसंपर्क कार्यालयात आज 'घरगुती एल.पी.जी गॅस सुरक्षा अभियानांतर्गत' मोफत 'फायर अँड सेफ्टी' प्रशिक्षण कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं. या प्रशिक्षणात प्रामुख्याने घरगुती एल.पी.जी सिलेंडर वापरा विषयी माहिती, गॅस गळती व दुर्घटना होण्याची कारणे आणि त्याचा परिणाम गॅसची बचत व सुरक्षितता, उपाययोजना तसेच गॅस अपघात व दुर्घटना टाळण्यासाठी विज्ञानाने केलेली प्रगती,सतर्कता, सुरक्षितता व जनजागृती या विषयांवर उपस्थित महिलांना मार्गदर्शन कारण्यात आले.